Tuesday 22 February 2011

अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !
कधी लवचिक पाते खड्गाचें लवलवते,कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.
मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.
वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.
चालला पुढे तो लचकत मुरडत मान,अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !
हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,रे नकूल आला ! आला देख, नकूल !
थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.
पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !
रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !
क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।
संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,पिंजून कापसापरी पडे तो नाग,ते खंड गिळाया जमले कीटक भोती !
                             - कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment

click for free hit counter
get a free hit counter