Tuesday, 22 February 2011

अजुन


 
i

रात्रीं झडलेल्या धारांची
ओल अजून हि अंधारावर
निजेंत अजुनी खांब विजेचा
भुरकी गुंगी अन तारांवर
भित्र्या चिमणीपरी, ढगांच्या
वळचणींत मिणमिणे चांदणी
मळक्या कांचेवरी धुक्याच्या
वाऱ्याची उमटली पापणी
कौलावरुनी थेंब ओघळे
हळुच, सांचल्या पाण्यावरतीं;
थेंब ध्वनीचा हवेंत झुलतो
गिरकी घेऊन टांचेवरतीं
गहिऱ्या ओल्या कुंदपणांतच
गुरफटलेली अजुन स्तब्धता
कबूतराच्या पंखापरि अन
राखीकबरी ही अंधुकता
अजून आहे रात्र थोडिशी,
असेल अधिकहिकुणि सांगावें?
अर्धी जाग नि अर्धी निद्रा
इथेंच अल्गद असें तरावें!
- मंगेश पाडगांवकर

चेहरा 2

आगगाडीच्या फलाटावर
शेकडो पायांची ,बिन चेह~याची गर्दी;गलका असंबद्ध आवाजांचा
धावपळ, रेटारेटी संवेदना शुन्य…….
आणि ते लहान मुल केविलवाणे,त्याची आई हरवलेली आंधळ्या गर्दीत,ओक्साबोक्शी रडणारे,असंबद्ध आवाजांच्या पुरात बुडणारे…..
हळवा होतो माझा जीव,मी जातो त्याच्या जवळ,मला दिसतो त्याचा चेहरा;
आणि मला आश्चर्याचा धक्काच बसतो:तो चेहरा माझाच असतो!
मंगेश पाडगांवकर

छोरी

थबकुनी थोडी
वळुनी पुढे घाईनें
प्रौढ नि बुटक्या झाडाजवळुन जास्वंदीच्या
जाते वाट पुढे ही शाळेपाशी
शाळा:चौकॊनी खॊकेच खिडक्यांचे
रंग सफेद चुन्याचा
छप्पर लाल नळ्यांचे
भल्या पहाटे (आठ वाजता)झाडांचीही नसते जेंव्हा झोप संपली
सुरु व्हायची शाळा …….पहिली घंटा….दुसरी घंटा……..सुरु प्रार्थना आणि नंतर:
नमन तुला गणराया
बुद्धी जाग्रुती देई मुलां या
….
एक जांभई.
कर्कष्य आवाजाने नंतर हुकुम व्हायचा:
काढा पाट्या
कुठे उजळणी
चला दाखवा
माझी पाटी कोरीहात पुढे….भिंगे खवचट चष्म्याची रोखुनिया बघती
वेत सपासप माझ्या हातांवरती
किती वेळ रडलो नाही ठाऊक
आली अवचीत जाग स्पर्शता हात मऊ
मी पाहिले शेजारी;
नविन कोणी मुलगी
केस भुरे सोनेरी
निळसर डोळे…….
मी विचारले तिज, “नांव काय तुझे….”ती खट्याळ हसली आणि म्हणाली
नांव? छोरी ….हात पुढे कर.”आणि नजर खॊडकर
आणिक माझ्या हातावरतीदुखर्या हातावरती .चिमणिच्या नाजुक दातांनी तोडियली
फोड एक कैरीची….
फोड एक कैरीची;अजुन ताजी
जिभेवर जिची आंबट गोडी,भुरभुरती सोनेरी कुंतल,
अजुन घेते टिपुनी वेदना
नजर तिची ती निळी खॊडकर…..गिरकी घेते मनीं कलाबुत तिच्या स्वरांची;
नांव? छोरी…. हात पुढे कर
मंगेश पाडगांवकर. १०-१०-१९५३

सहानभूती


उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी
प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी
कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग
भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला
जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास
नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला
तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर
म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी
खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट
आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात
- कुसुमाग्रज
click for free hit counter
get a free hit counter